Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

होळी - धूलिवंदन

होळी -धूलिवंदन



               एकदा हिरण्यकश्यपू नावाचा असुरराजा होता त्याची पत्नी कयाधू हि पत्नी होती. त्यांना चार मुले होती त्यात चोथ्या क्रमांकाचा मुलाचे नाव प्रल्हाद होते. कयाधू हि श्रीविष्णूची मोठी भक्त होती. आणि ती सतत देवाचे नामस्मरण करत असे. त्यामुळे प्रह्लाद त्याच्या आईच्या गर्भात असल्यापासून श्रीविष्णूचा भक्त झालेला असतो.

               नंतर हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाचे घोर तप केले. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अरण्यात तप केले. त्यावर प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रगट झाले आणि म्हणाले कि, "  हिरण्यकश्यपू मी तुझ्यावर प्रसन्न तुला जे हवे ते माग " त्यावर  हिरण्यकश्यपूने त्यांच्याकडून वर मागून घेतला की, "त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार नाही ,कुठल्याही अस्त्र किंवा शस्त्राने त्याचा मृत्यू होऊ नये.". आणि ब्रह्मदेवांनी " तथास्तु" बोलून ते अंतर्धान पावले. 


                हिरण्यकश्यपू खूप खुश झाला त्याला वाटले की, त्याला आता कुणीही मारू शकणार नाही. वरदानामुळे त्याला अहंकार झाला. "जगात सर्वश्रेष्ठ मीच आहे", असे त्याला वाटायला लागले. कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला आवडत नव्हते. त्याने संपूर्ण राज्यात जाहीर करून टाकले कि, आजपासून मीच तुमचा देव आहे. कुणीही कुठल्याच देवाची पूजा करू नये. आणि तसे जर कुणी केले तर त्याला फाशी देण्यात येईल.  प्रजा घाबरली त्यांनी आपले सर्व देव लपवून ठेवले आणि हिरण्यकश्यपूचे नाव तोंडाने घेऊ लागले. परंतु त्यांच्या मनात मात्र देवाचेच नाव असे. त्याने स्वतःचीच मूर्ती बनवून मंदिर बनवले. त्याची पत्नी कयाधू हिने त्याला सतर्क केले कि, काही झाले तरी तुम्ही देव नाही एक असुर आहात. आणि या जगात आतापर्यंत कोणीही अमर झालेले नाही.तेव्हा त्याने कयाधुचे म्हणणे ऐकले नाही. 

              इकडे त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेई. प्रह्लाद "नारायण नारायण" असा जप करत असे.  हिरण्यकश्यपूला  प्रल्हादचा राग येत असे.  वडिलांना देवाचा जप केलेला आवडत नाही.  म्हणून प्रल्हाद त्यांच्यासमोर येत नसे. 

              एके दिवशी प्रल्हाद नेहमीप्रमाणे तल्लीन होऊन श्रीविष्णूची पूजा करत असतो. त्याला हे कळलेच नाही  कि,राजा येत आहे.राजाने नामजप ऐकता क्षणीच शिपायांना आज्ञा केली की, डोंगराच्या उंच कड्यावरून प्रल्हादाला खोल दरीत ढकलून द्या. शिपायांनी  त्याला खोल दरीत ढकलून दिले आणि ते परत महालात येऊन त्यांनी हिरण्यकश्यपूला याची माहिती दिली. तो खुश झाला. थोड्यावेळाने पाहतो तर काय प्रह्लाद महालात परत आलेला आहे.  राजाने त्याला विचारले, " उंच कड्यावरून ढकलून दिले तरी तू जिवंत कसा ? तेव्हा प्रल्हाद हसून म्हणाला, "शिपायांनी मला ढकलले मी डोळे बंद करून "नारायण नारायण " जप करतच होतो. कुणीतरी मला झेलले असे वाटते . काही वेळाने मी डोळे उघडले तेव्हा मी राजवाड्याच्या दारापाशी होतो." राजा निराश झाला. त्याने प्रल्हादाला कारागृहात बंदी बनवून ठेवले. 

                  राज्याच्या मनात प्रह्लादासाठी राग होताच त्याची विष्णुभक्ती कशी कमी करायची याचाच तो विचार करत असे. एकदा त्याला सुचले, त्याने  शिपायांना आज्ञा केली कि, प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाका . कयाधूला हे समजताच तिने खूप गयावया केली परंतु हिरण्यकश्यपूने तिचे ऐकले नाही. शिपायांनी प्रह्लादला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले कयाधूने स्वतःचे डोळे बंद करून घेतले. थोड्या वेळाने पाहतात तर काय तेल उकळत आहे आणि त्यात एक कमल उमलले आहे प्रह्लाद त्यात बसला आहे आणि हसतोय. हे पाहून  हिरण्यकश्यपू आणखीच चिडला आणि त्याने रागाने प्रह्लादाला हत्तीच्या पायाखाली देण्याची शिपायांना आज्ञा केली. 

                     त्याला मैदानात आणण्यात आले आणि एका चिडलेल्या, पिसाळलेल्या हत्तीच्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. प्रह्लाद मात्र थोडाही घाबरत नव्हता तो सतत देवाचे नाव घेण्यात मग्न होता. हत्ती त्याच्या दिशेने येत होता सगळी प्रजा हे पाहण्यासाठी जमा झाली सर्वांच्या काळजाचा ठोका चुकलेला कि आता काय होईल ? आणि प्रह्लादने पुढे होऊन हत्तीच्या सोंडेला स्पर्श करत "नारायण नारायण " म्हटले , आणि काय आश्चर्य , हत्ती एकदम शांत झाला . राजा रागाने तेथून निघून गेला. 

                     हिरण्यकश्यपू विचार करू लागला आता काय करायचे , प्रह्लादला कसे मारायचे ? इतक्यात हिरण्यकश्यपूची बहीण होलिका तेथे आली, आणि ती बोलली दादा, आपण घाबरू नका. मी विचार केलाय कि प्रह्लादला काय शिक्षा द्यायची ? त्यावर त्याने तिला विचारले कि काय ते लवकर सांग. "दादा तुला माहितीच आहे. कि, मला अग्नीचे भय नाहीये, मला वरदान मिळालेले आहे कि आग मला काही इजा पोहचवू शकत नाही. त्यावर  हिरण्यकश्यपू म्हणतो कि, तुला मिळालेल्या वरदानाचा आणि  आणि   प्रह्लादला शिक्षा देण्याचा काय संबंध ?
तेव्हा होलिका बोलते कि, तुम्ही एक चिता किंवा लाकडे एकावर एक रचा आणि मी प्रह्लादाला घेऊन त्यात बसते मला तर आग भस्म करु शकत नाही, परंतु प्रह्लाद जळून जाईल आणि तुझा शत्रू नष्ट होईल.

               हिरण्यकश्यपू शिपायांना आज्ञा करतो कि, एक खूप मोठी चिता तयार करा. शिपायांना काहीच कळत नाही कि कशासाठी हे करायचे परंतु राजाची आज्ञा आहे म्हणून ते राज्याच्या मध्यभागी एक भव्यअशी चिता तयार करतात.   हिरण्यकश्यपू होलिकेला प्रल्हादला मांडीवर घेउन चितेवर बसण्यास सांगतो. ती तसेच करते. चिता पेटवली जाते. सारी प्रजा हे पाहत असते . त्यांना माहित असते कि हे योग्य नाही . परंतु राजापुढे कोण बोलणार? प्रल्हाद तेव्हा देखील भगवान विष्णूंच्या नामस्मरणात तल्लीन होता.प्रल्हादाच्या भक्तीमुळे  वेगळेच घडते. त्या चितेमध्ये होलिका जळून खाक होते. पाऊस येतो. विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादला मात्र अग्नी देखील काही करु शकली नाही. प्रजा खुश झाली. त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला. आणि तो दिवस ‘होलिका दहन’ म्हणून ओळखला जाऊ   लागला. 

                  हिरण्यकश्यपू खूप संतप्त झाला. त्याने चिडून राजसभा बोलवली आणि प्रह्लादला सर्वासमोर उपस्थित होण्यास सांगितले. प्रह्लाद राजसभेत आला. हिरण्यकश्यपू भगवान विष्णुबद्दल वाईट शब्द उच्चारू लागला. आणि बोलला माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. मीच या जगाचा देव आहे. आता मात्र प्रह्लादला वडिलांचा राग आला तो पहिल्यांदाच त्यांना बोलला कि, देव सगळीकडे आहे. तो तुमचे बोलणे एकत असेल. हिरण्यकश्यपू म्हणतो कि, " कुठे आहे तुझा देव ?" "माझा देव चराचरात आहे. सर्वांच्या मनात आहे , धरती आकाश सगळीकडे आहे. "हिरण्यकश्यपू खूप संतप्त झाला.तो सिंहासनावर उठला आणि एका खांबाकडे बोट करून म्हणू लागला. " या खांबात आहे का तुझा देव , बोलावं त्याला इथेच मी त्याला मारून टाकतो."

               प्रह्लाद म्हणतो कि,हो माझे नारायण या खंबातसुद्धा आहेत. आणि त्यांची मनापासून आळवणी कोणी केली तर ते त्यांच्या भक्ताला नक्कीच दर्शन देतात. हे ऐकताच हिरण्यकश्यपूने रागाने त्या खांबाला लाथ मारली. आणि पाहतात तर काय त्यातून नरसिंह रूपाने प्रत्यक्ष नारायणाने अवतार घेतला. त्या नरसिंहाचे  अर्धे शरीर सिंहाचे व अर्धे शरीर मानवाचे होते.

             नरसिंहाने कोणाला काही कळायच्या आत हिरण्यकश्यपूला त्याचाच महालाच्या दाराच्या उंबऱ्यावर बसून स्वतःच्या मांडीवर घेतले आणि सांगितले कि, बघ आता ना दिवस आहे ना रात्र आता संध्याकाळ आहे. , मी माणूस नाही कि प्राणी , ना तू घरात आहेस ना बाहेर " असे बोलून  नरसिंहाने आपल्या वाघ नखांनी त्याची छाती फाडून त्याचा वध केला.नरसिंहअवतार भगवन विष्णूंच्या अवतारांपैकी हा एक अवतार आहे.

               तेव्हापासून भारतात आनंदाने होळी पेटवली जाते. यालाच शिमगा असेही म्हणतात.  झाडांच्या सुक्या काटक्या , शेणाच्या गोवऱ्या एकावर एक रचून  होळी पेटवली जाते.  याने वातावरणातील हवा शुद्ध होते. यात अनेक औषधी झाडाची लाकडे जाळतात कारण रोगजंतूचा त्यात नाश होतो. होळी पेटवल्याने कीटकांचा नाश होतो.होळीला नारळ अर्पण केला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवीला जातो. 

               होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला 'धुळवड' असेही म्हणतात.होळीमध्ये पाणी टाकून त्यामध्ये धुळवड साजरी केली जाते ती राख एकमेकांच्या अंगाला लावली जाते. 
सारे राग रुसवे  विसरुन सर्वांनी एकत्र येऊन रंग खेळतात. हा सण एकतेचे प्रतीक म्हणून साजरा करतात.  

होळी नंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षात पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासोबत पिचकारीने रंगीत पाणी एकमेकांच्या अंगावर उडवून  होळी खेळत असे . लहानमोठयांसाठी हा सण विशेष असतो आणि त्यांना आवडतो. एकमेकांना रंग लावले जातात. फुग्यांमध्ये रंगीत पाणी भरून एकमेकांच्या अंगावर ते फोडले जातात.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या