लक्ष्मीपूजन
लक्ष्मी हि समुद्रमंथनातून प्रगट झालेली आहे. ती समुद्राची आणि नदीची मुलगी आहे. समुद्रमंथनामध्ये देव आणि दानव मिळालेल्या वस्तू समप्रमाणात वाटून घेतात त्याप्रमाणे देवांना लक्ष्मी मिळाली. त्यानंतर तिचा विवाह भगवान विष्णूसोबत झाला. आणि देवी सर्व जगाची पालनकर्ती किंवा जगतजननी झाली. त्यामुळे श्री विष्णूची पूजा केली तर देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते अशी भक्तांची समजूत आहे. त्यामुळे यादिवशी विष्णूची पूजा केली जाते.
एकदा अश्विन अमावसेच्या दिवशी लक्ष्मी देवी स्वतःला राहण्यासाठी जागा शोधत असते परंतु तिला कुठल्याच मोठ्या घरात समाधान , शांती, देवभक्ती, अतिथीचा सन्मान करणे या गोष्टी दिसत नाही. संध्याकाळ होते. सरतेशेवटी ती एका झोपडीपाशी येते. तेथे एक म्हतारी बाई देवीला दिसते. ती प्रसन्नपणे देवीचे स्वागत करते. आपल्यकडे जे काही असते त्या जिन्नसाने स्वयंपाक करून तिला वाढते. यामुळे लक्ष्मीदेवी प्रसन्न होते आणि बोलते कि,यापुढे मी अशाच ठिकाणी वास करेल जिथे शांती आणि समाधान असेल स्त्रीचा आदर केला जाईल.
अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते असा भक्तांचा विश्वास आहे. तेव्हापासून या दिवशी लक्ष्मीपूजा करण्याची प्रथा पडली.जेथे समाधानी ,चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष, पतीव्रता स्त्रिया असतात त्याच ठिकाणी किंवा घरी राहणे देवी लक्ष्मीला आवडते असे मानतात. लक्ष्मी स्वभावाने चंचल असते ती एका ठिकाणी जास्त काळ राहत नाही अशी मान्यता आहे.
त्यादिवशी ब्राम्हमुहूर्तावर अभ्यंगस्नान करून देवपूजा करतात. घराची साफसफाई केली जाते. आरास केली जाते. वेगवेगळे गोड पदार्थ केले जातात. उत्तम खाद्यपदार्थ आणि मिष्टान्न तयार केले जातात. अंगणात सडा - रांगोळी काढली जाते. दिव्यांची माळ लावली जाते. आकाशकंदील लावला जातो. "दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा" असे म्हणत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तेलाचे मातीचे दिवे लावले जातात. पूजेनंतर फटाके फोडले जातात. संपूर्ण घर दिव्यांनी उजळवून टाकतात.
संध्याकाळी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. एका पाटावर कोरे वस्त्र अंथरून त्यावर तांदळाची रास ठेऊन त्यावर देवी लक्ष्मी चा फोटो किंवा मूर्ती ठेवावी .डावीकडे गणपती ठेवावा. श्रीविष्णु म्हणून ऊस ठेवला जातो. घरातील केर कचरा साफ करणारी झाडू किंवा कुंचा याचीही पूजा केली जाते. केरसुणी हि लक्ष्मीची प्रतिमा समजतात,जी घरातील घाण बाहेर नेऊन घरात सुबत्ता आणते. घरातील सर्व सोन्या-चांदीचे दागिने आणि पैसे एका ताटात ठेवले जातात. हार, फुले वाहून , दिवा ,अगरबत्ती , धूप लावला जातो मनोभावे देवी लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपाआशीर्वाद नेहमी राहावा हि प्रार्थना केली जाते.पंचपक्वानाचा नेवेद्य दाखवला जातो. आरती केली जाते.नारळ फोडून प्रसाद म्हणून वाटला जातो. लक्ष्मीदेवीप्रमाणेच या दिवशी कुबेराचे पूजन करण्याची देखील प्रथा आहे. श्रीयंत्र म्हणजेच लक्ष्मीयंत्राची पूजा करतात श्रीयंत्राला स्मरण करून शांतपणे श्रीसूक्ताचे पठण सोळा वेळा करावे.
व्यापारी आपल्या दुकानात ,कार्यालयात तसेच सर्वच ठिकाणी लक्ष्मीपूजनाला मोठं महत्त्व आहे. मोठ्या उत्साहात ते हा सण साजरा करतात. वर्षभर लागणाऱ्या वह्यांची पूजा या दिवशी केली जाते.

0 टिप्पण्या