Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

साडेतीन शक्तिपीठे


शक्तीपीठ कसे निर्माण झाले त्याची कथा

        देवी सती आणि शंकर भगवान यांच्या लग्नानंतर ,सतीदेवीचे पिता महाराज दक्ष यांनी महायज्ञ ठेवला आणि सर्व देवलोकाना आमंत्रण दिले. परंतु सती देवी – शंकर भगवान यांना आमंत्रण दिले नाही. कारण त्यांना शंकर भगवान पसंत नव्हते. सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी निघाली. शंकर भगवानने तिला जाण्यास रोखले ते बोलले की, तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू तेथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील, म्हणून तू जाऊ नकोस.'
        परंतु सती देवीने त्यांचे ऐकले नाही. व ती तिथे गेली सतीदेवीने राजा दक्षला याचा जाब विचारला असता ,राजा दक्षने भगवानशंकरांचा अपमान केला आपल्या पती विरोधात अपमानास्पद ऐकून देवीसती संतप्त झाल्या.आणि त्यांनी राजादक्ष, समस्त देवयांच्या समोर त्याच महायज्ञ कुंडाच्या अग्नीत प्रवेश केला.

हा सर्व वृत्तांत भगवान शंकरांना देवर्षी नारंदानी सांगितल्यावर ते त्या ठिकाणी गेले, त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडवनृत्य करायला सुरुवात केली, त्याचा परिणाम संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला, सगळीकडे निसर्गानी कोप केला. हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल, म्हणून श्री विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले.
 सुदर्शन चक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले, तेव्हा शिवाचा राग शांत झाला. त्याच क्षणी शंकर भगवान भानावर आले आणि त्यांनी सतीचे असे तुकडे पाहून श्री विष्णूंना श्राप दिला. ह्या शापाला मोडण्यासाठी श्री विष्णूंनी एकावन्न सतीच्या शक्तिपीठांकडे जाऊन सती देवीची आराधना केली. तेव्हा सती देवींनी श्री विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल असे सांगितले.
 तेव्हा श्री विष्णूंनी भगवान शंकरांना वचन दिले, की सती ही हिमालयाची पुत्री बनून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल. सतीचे शक्तिपीठ भारतात एकावन्न जागांवर पडले म्हणून यांना एकावन्न शक्तिपीठ असे म्हणतात

साडेतीन शक्तिपीठे

जेव्हा जेव्हा भूतलावर अन्याय होतो अत्याचार होतो. तेव्हा तेव्हा देवी कालीमातेचे , दुर्गामातेचे रूप घेते आणि अधर्माचा नाश करते . भारतातील एकावन्न शक्तिपीठांपैकी साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रामध्ये आहेत. देवीच्या जागृत स्थानास शक्तीपीठ असे म्हटले जाते .


तुळजापूरची तुळजाभवानी

शक्तिपीठांपैकी पहिले शक्तीपीठ उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर म्हणून ओळखले जाते.  तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर येथे कर्दम ऋषींच्या पत्नी अनुभूतीच्या सौदंर्यावर कुकर नावाचा राक्षस लुब्ध झाला. त्याच्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ऋषीपत्नी अनुभूतीने आदिशक्तीचा धावा केला. तिच्या हाकेला देवी त्वरित धावून आली तिने कुकर राक्षसाचा वध केला. भक्ताच्या हाकेसरशी देवी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता हे नाव पडले कालांतराने त्वरिताचे तुळजाभवानी हे नाव प्रचलित झाले.
तुळजापूर हे क्षेत्र बालाघाटावर किंवा यमुनाचल यानावाने पूर्वी प्रसिद्ध होते. या स्थानाचा उल्लेख पुराणांमध्ये दिडीरवण म्हणून मिळते.  जेथे देवीने राक्षसाचा वध केला तेथेच तुळजाभवानीचे मंदिर बांधण्यात आले.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी आणि भाद्रपद वाद्य अष्टमी ते अमावस्या या काळात देवी निद्राधीन असते. बाकीच्या अष्टोप्रहर देवी जागृत असते.


मंदिरात जाताना प्रथम डावीकडे कल्लोळ आहे जे १०८ तीर्थांचे आहे. उजवीकडे गोमुख आहे, त्यातून देवीचे अभिषेकाचे तीर्थ असते. गाभार्याच्या बाहेर होमकुंड आहे. ते १० फूट खोल आहे. देवीच्या सिंहासनाशेजारी  देवीचे न्हाणीघर आहे. सभामंडपाच्या बाजूला देवीचा चांदीचा पलंग आहे. देवीसमोर भवानीशंकराची मूर्ती आहे. भवानीमातेला  अष्टभुजा आहेत. तिच्या पाठीवर बाजाचा भाता आहे. हातामध्ये त्रिशूल , बिचवा,बाण , चक्र ,शंख,धनुष्य ,पानपात्र एका हातात राक्षसाची शेंडी आहे. डावा पाय जमिनीवर असून उजवा पाय राक्षसावर आहे. 

कसे जावे :- ट्रेनने सोलापूर स्थानकावर उतरून तुळजापूर ४५ कि.मी.आहे. एसटी बसेस उपलब्ध आहेत. खाजगी वाहनाने जाता येते.

कोल्हापूरची अंबाबाई

          दुसरे शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई. दक्ष प्रजापतीच्या यज्ञात आहुती दिलेल्या देवी सतीचे नेत्र याच ठिकाणी पडले. पुण्यापासून २०० कि.मी. अंतरावर कोल्हापूर आहे. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. देवीची मूर्ती एका चौकोनी दगडावर उभी आहे. मूर्ती काळ्या पाषाणातील आणि तीन फूट उंच आहे. महालक्ष्मी देवीला चार हात असून मागच्या हातामध्ये देवीने ढाल आणि तलवार धारण केली आहे. खालच्या हातामध्ये पानपात्र आणि मातुलुंग आहे. डोक्यावर भगवान श्रीविष्णूची बसलेली फणाधारी शेषनाग नक्षी असलेला मुकुट घातलेला आहे.

एक कथा अशीही आहे कि अंबाबाई हि तिरुपती बालाजी म्हणजेच व्यंकटेश यांची पत्नी , देवांच्या दुसऱ्या विवाहाच्या बातमीने रुष्ट होऊन तेथून निघून कोल्हापूरला येऊन राहिली. दरवर्षी तिरुपती बालाजी देवस्थानतर्फे देवीला साडी चोळी पाठविली जाते. तसेच जे भाविक तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जातात त्यांना त्यानंतर अंबाबाईचे दर्शन घ्यावे लागते , तरच त्यांचे दर्शन सफल होते. त्यांना दोघांचाही आशीर्वाद मिळतो. त्यांचे सर्व दुःख दूर होतात.
महालक्ष्मी हे अनेकांचे कुलदैवत आहे. घरामध्ये काही मंगलकार्य असल्यास पहिले आमंत्रण अंबाबाईला देण्याची प्रथा आहे.


ब्रह्मदेवाचा मानसपुत्र कोल्हासूर आणि कोल्हासुराचा पुत्र करवीरासूर या दोन राक्षसांनी ऋषीमुनींना , देवलोकाना  त्रास दिला. त्यामुळे इंद्राच्या विनंतीमुळे महालक्ष्मीने त्या दोघांचा वध केला. नंतर त्यांनी मृत्यूपूर्वी देवीकडे वर मागितला कि हे स्थान आमच्या नावाने ओळखले जावे. तेव्हापासून या ठिकाणचे नाव 'कोल्हापूर' किंवा  "करवीर नाव पडले. तसेच त्यानंतर देवी इथेच राहिल्यामुळे महालक्ष्मीला "करवीरनिवासिनी" असे नाव प्रचलित झाले.

 सकाळी . ३० वाजता काकडआरती होते., सकाळी . ३० वाजता देवीची महापूजा होते. ११. ३०. वाजता देवीची नैवेद्य आरती होते. . ३० वाजता देवीची घंटानाद करत देवीची आरती होते. रात्री दहा वाजता देवीची शेजारती होते. अशाप्रकारे देवीची एकूण पाच वेळा आरती करण्याची प्रथा आहे.

कसे जावे :- महाराष्ट्रातून सर्व प्रमुख एसटीस्थानकातून कोल्हापूरला बसेस आहे.कोल्हापूर एसटी स्थानकापासून अंबाबाईचे मंदिर २. ७ कि.मी. आहे 



माहूरची रेणुका देवी
         नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर येथे हि देवी आहे. अनेक महाराष्ट्रीयन घरातील कुलस्वामिनीचे भक्तीस्थान म्हणून या क्षेत्राकडे पाहिले जाते.जमदग्नी ऋषींकडे कामधेनू हि गाय होती. तिला मिळवण्याच्या हेतूने सहस्राजुर्नाने जमदग्नी ऋषींचा वध केला
        तेव्हा त्यांचा पुत्र परशुरामाने  पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून एक कावड तयार करून त्या कावडीच्या एका बाजूस जमदग्नी ऋषींचे पार्थिव शरीर आणि दुसऱ्या पारड्यात माता रेणुका यांना बसविले. त्यांना घेऊन तो माहूरगडावर आला. त्याने तिथे पित्याचे अंतिम संस्कार केले. माता रेणुकाही त्याच ठिकाणी सती गेल्या. मात्र माता रेणुकाच्या आठवणीने परशुराम व्याकुळ झाला. तेव्हा एक आकाशवाणी झाली "तुझी आई जमिनीतून वर येईल फक्त तू मागे वळून पाहू नकोस "परंतु परशुरामाने उत्सुकतेपोटी वळून पहिले. तोपर्यंत जमिनीतून देवीचे मुखच बाहेर आले होते. नंतर तेथे परशुरामाने रेणुका मातेचे मंदिर बांधले. आणि त्या मुखाचीच तेथे स्थापना केली.


माहूर हे समुद्रसपाटीपासून १८०० फूट उंच डोंगरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी २५५ पायऱ्या चढाव्या लागतात देवीचा तांदळा भव्य आहे. चांदीचा मुकुट आहे. कपाळ विशाल असून नाकात नाथ  आहे. नजर अतिशय भेदक आहे.

कसे जावे :-मुंबई तो माहूरगड  हे अंतर ७०० कि.मी. पुणे तो माहूरगड  हे अंतर ५५५ कि. मी.आहे.  


वणीची सप्तशृंगी देवी
          अर्धे शक्तीपीठ म्हणून वणीची सप्तशृंगी प्रसिद्ध आहे. नाशिकजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये ५२५० फूट उंचीवर वणी हे स्थान वसलेले आहे. ब्राह्मदेवाच्या कमंडलूमधून निघालेल्या महानदीचे रूप म्हणजेच सप्तशृंगी देवी असे मानले  जाते.
      देवीची मूर्ती आठ फूट उंचीची असून देवीला अठरा हात आहेत. देवीला अकरा वार साडी लागते. चोळीसाठी तीन खण कापड लागते.



                         यामागील कथा अशी कि, महिषासुराचा वध केल्यानंतर देवी आरामासाठी किंवा विसावा घेण्यासाठी या गडावर आली,आणि येथील निसर्गसौन्दर्यावर लुब्ध होऊन इथेच राहिली. देवीची मूर्ती स्वयंभू असून अतिशय भव्य आहे. प्रत्येक हातात वेगवेगळी अस्त्र शस्त्रे आहेत. देवीची पूजा शिडी लावून करावी लागतेयेथे सात पर्वतशिखरे आहेत त्यामुळे या ठिकाणाला सप्तशृंगी असे नाव पडले. मूर्ती पूर्वाभिमुख आहे. सकाळी देवीचे रूप हे लहान मुलीप्रमाणे , दुपारी तरुणीप्रमाणे आणि रात्री वृद्धेप्रमाणे भासते.


कसे जावे :-नाशिकपासून ७० कि.मी. अंतरावर वणी हे स्थान आहे.मुंबई तो वाणी हे अंतर १८९ कि.मी. पुणे तो वाणी हे अंतर २२० किमी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या