चेहऱ्याचे प्रकार आणि हेअरस्टाईल- हेयरकट
संपूर्ण हेअरस्टाईल, मेकअप आणि हेयरकट या तंत्रामध्ये चेहरा हा पाया धरला जातो त्यानुसार त्याचा आकार नक्कीच लक्षात घेऊन काम केले तर कुठल्याही कार्यक्रमात आपले रूप वेगळेच दिसू शकेल. त्यासाठी चेहऱ्याच्या प्रकारानुसार जर हेअरस्टाईल आणि हेयरकट केला तर नक्कीच फायदा होतो.
पुढे काही चेहऱ्याचे आकार किंवा प्रकार देत आहे आणि त्यांना कुठला हेयरकट किंवा हेअरस्टाईल सूट होईल ते पाहू -
लंबगोल अंडाकृती चेहरा (Elliptical oval face)
या चेहऱ्याला युनिव्हर्सल आकार असे म्हणतात. या चेहऱ्याला कोणतीही केशरचना आणि हेयरकट सूट होतो. यात कमी उंचीच्या व नाजूक स्त्रिया असतील तर बॉयकट ,उंच असतील तर पोनीटेल छान दिसेल. या चेहऱ्याला बॉबकट हि छान दिसेल
गोल चेहरा (Round face)
या चेहऱ्यामध्ये उंची कमी आणि रुंदी जास्त असते. त्यामुळे चेहऱ्याला उंची देऊन गालाच्या बाजूने चेहरा झाकेल अशाप्रकारे केशरचना करावी. साधारणपणे ब्लन्टकट जास्त सूट होतो . यामध्ये चेहऱ्याला उंची वाढवण्यासाठी कपाळावरचे केस कापून वरच्या बाजूस वळवावे . यामुळे चेहऱ्याची उंची वाढेल तसेच कट हा आतील बाजूस वळविल्यामुळे चेहऱ्यातील गोलपणा झाकला जाईल.
उभा आयताकृती चेहरा (Vertical rectangular face)
हा चेहरा उंचीला जास्त आणि रुंदीला कमी असतो. कपाळपट्टी मोठी असते. चेहरा अंडाकृती दिसण्यासाठी चेहऱ्याची उंची प्रथम कमी करावी लागेल. याकरता केस कपाळावर येतील अशा प्रकारची हेयरस्टाईल किंवा कट करावा. टाळूवरील थोडे केस पुढे घेऊन क्लिप्स लावल्या तरी छान दिसतील . आवड असेल तर कपाळपट्टीवरील केस थोडे कापावे. साधना कट छान दिसेल. चेहऱ्याची लांबी कमी करण्यासाठी लॉन्ग स्टेप कट करावा. लॉन्ग बॉयकट , स्टेपकट हेही छान दिसतील.
बदामी चेहरा (Almond Shape Face)
हा चेहरा आणि अंडाकृती चेहरा यात फार थोडा फरक असतो. हनुवटीच्या भाग अतिनिमुळता असतो. गाळापासून तो सरळ रेषेत त्रिकोणी होत जातो. गाळाच्या इथे अंडाकृती असतो. कपाळापेक्षा हनुवटी १/३ अंश लहान असते. या चेहऱ्यामध्ये हनुवटीच्या भाग छोटा असल्यामुळे तो झाकण्यासाठी कानावरून जाणारा लॉन्ग स्टेपकत तसेच लॉन्ग लेअर कट सूट होईल.
पंचकोनी चेहरा (Pentagonal face)
या चेहऱ्यामध्ये जबड्याचे हाड मोठे असते त्यामुळे चेहऱ्याच्या बाहेरील बाजूने हे दिसून येते. हनुवटी कपाळपट्टीपेक्षा बरीच लहान असते. त्यासाठी चेहऱ्यावर केस आले पाहिजेत अशाप्रकारची हेयरकट करावा उदाहरणार्थ डीप लेअर कट किंवा लॉन्ग उ कट.
त्रिकोणी चेहरा (Triangular face)
हा चेहरा हनिवटीपासून त्रिकोणी होत जातो. हनुवटीचा भाग हा कपाळापेक्षा खूपच लहान असतो त्यामुळे एकूण शारीरिक आकारमानापेक्षा आणि वयापेक्षा चेहरा नाजूक आणि लहान दिसतो. या चेहऱ्याला लेयरकट छान दिसेल.
फार मोठा चेहरा (Very big face)
काही स्त्रियांच्या एकूण आकारमानापेक्षा चेहरा फार मोठा दिसतो. शरीरयष्टी लहान असल्यामुळे चेहरा मोठा दिसतो. त्यासाठी लॉन्ग उ कट किंवा स्टेप कट सूट होईल.

0 टिप्पण्या